Home Local news चंद्रपूर सिटीझन फ्रंट ची अंधश्रद्धा विरोधात जनजागृती

चंद्रपूर सिटीझन फ्रंट ची अंधश्रद्धा विरोधात जनजागृती

212

 

 

चंद्रपूर: मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या चार घटनांनी संपूर्ण जिल्हा हलवून सोडला आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात उद्योगधंद्यांत पुढे असला आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाश देत असला तरी सामाजिक क्षेत्रातील काळोख चंद्रपूर जिल्हा आणि परिसरात पहावयास मिळतो. जादूटोणा केल्याच्या संशयावरून जिवती, नागभीड आणि इतरही परिसरात जादूटोण्याच्या संशयित लोकांना खांबांना बांधून मारहाण केलेली आहे.

अशा घटना फक्त कायद्याने संपवता येणार नाहीत, अंधश्रद्धा निर्मूलन समिति आणि इतरही संघटनांना नागरिकांची मदत मिळणे गरजेचे आहे, हे उद्दिष्ट समोर ठेवून चंद्रपूर मधील नव्यानेच स्थापन झालेल्या ‘चंद्रपूर सिटीजन फ्रंट’ या अशासकीय संघटनेच्यावतीने नुकतेच एक जनजागृती शिबिर चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ वरोरा नाका चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुशिल कुमार नायक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक श्री अनिल दहागावकर यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिति’ सतत कार्य करीत आहे, महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे केलेले आहेत परंतु असे असतानाही एकविसाव्या शतकात अंधश्रद्धा अनेकांच्या मनात घर करून आहे, अगदी कोरोना मुळे झालेला मृत्यू सुद्धा जादूटोणा केल्यामुळेच झाला इतपर्यंत अंधश्रद्धा आमच्या डोक्यात बसली आहे. अशा प्रकारच्या भावना वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केल्या.

 

या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक श्री अनिल दहागावकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या संदर्भात होत असलेल्या घटनांच्या बद्दल अत्यंत भयानक अशा सद्यस्थितीचे वर्णन केले. तर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुशिल कुमार नायक यांनी अंधश्रद्धा, नरबळी आणि जादूटोणा विरोधी कायदा जनतेसमोर मांडला. श्री नायक यांनी कायद्यात असलेली शिक्षा समजावून सांगितली परंतु हा कायदा यशस्वी होण्यासाठी आणि एक सुदृढ समाज घडण्यासाठी नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षाताई जामदार या होत्या, कार्यक्रमाचे संचालन योगेश दूधपचारे यांनी केले प्रस्तावना प्रा सुरेश चोपणे यांनी तर आभार चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली यांनी मानले. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील सुजाण नागरिकांची उपस्थिती होती.

 

 

सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.