चंद्रपूर दि. २ मार्च २२ ( सुनील तायडे )
अवैध रेती उत्खनन करताना मारोती गेडामचा मृत्यू, तहसीलदार साहेब अजून किती बळी हवेत रेती तस्करांवर कारवाई साठी ?
सोमवारी दि. २८ फेब्रू रोजी पठानपुरा जवळ इराई नदीच्या पात्रातून रेतीचा अवैध उपसा सुरू असताना नांदगाव येथील मारोती गेडामला जीव धोक्यात घालून ट्रॅक्टर मालक बानकर यांनी धोकादायक ढिगाऱ्यात घुसून रेती काढण्यास भाग पाडले. रेती उत्खननाचे कार्य सुरू असतानाच अचानक ढिगारा कोसळून मारुती गेडाम रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबला व त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती ट्रॅक्टर मालक बानकर यांना देण्यात आली. ट्रॅक्टर मालक बानकर यांनी या घटनेची माहिती चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनला न देता घटनास्थळीच मृत्यू झालेल्या मारुती गेडाम ला सरकारी रुग्णालयात दाखल केले. रेती भरतीचे कार्य करणाऱ्या मजुरांनी पिडीत कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याची मागणी रेटून धरली तोपर्यंत मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेणार नाही अशी भूमिका घेतल्याने सरतेशेवटी मारुती गेडाम कुटुंबीयांना ट्रॅक्टर मालक बानकर यांनी तीन लाख रुपये देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. 1 मार्च रोजी किमान 400 मजुरांनी काम बंद ठेवून निरोप दिल्याने इरई नदीचे ते पात्र ओसाड पडले होते. दरम्यान मारोती गेडामच्या कुटुंबियांना ट्रॅक्टर मालकाने 3 लाख रु आर्थिक मदत दिल्याने वातावरण जरी शांत झाले आहे.असे असले तरी या घटनेस नेमकं जवाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे. जिल्हा प्रशासन व चंद्रपूर पोलिसांचं अक्षम्य दुर्लक्षामुळे आतापर्यंत अनेक निष्पापांचा रेती घाटावर मृत्यू झाला असला तरी हे संपूर्ण प्रकरण रेती तस्कर मोठ्या शिताफीने हाताळून पीडित कुटुंबांना थातुरमातुर आर्थिक मदत देऊन संपूर्ण प्रकरण दडपण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, त्यामुळे आतापर्यंत अवैध रेती कोळसा उत्खननात कितीजणांचा मृत्यू झाला हे एक रहस्यच आहे
रात्रीचे उत्खनन कसे थांबवावे हा यक्ष प्रश्न तहसीलदार निलेश गौड यांना पडल्याने या संपूर्ण अवैध रेती तस्करी प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इरई पात्रात अवैध उत्खनन चालते याची संपूर्ण कल्पना आहे. बरेच वेळा कारवाई देखील केली. ट्रॅक्टर जप्त करून लिलाव केले. पण त्या क्षेत्रात रात्री कारवाई करणे शक्य नाही. तिथे शासकीय वाहन जात नाही. मारोती गेडामच्या मृत्यूची तक्रार पोलिसांना करून तपास करायला सांगितले. पण,तपास सुरू झाला की नाही कल्पना नाही.
दिवाळी पूर्वी तहसीलदार निलेश गौड यांनी पठाणपूरा रेतीचे अवैध उत्खनन करणार्यांवर चांगलीच जरब बसवली होती. इराई नदीच्या नदीघाटावर जाणारे ट्रॅक्टर मालकांनी निर्माण केलेले सर्व रस्ते जेसीबीने खोदून बंद केले होते. परंतु नेमके असे काय घडले ? दिवाळीच्या दिवसापासून हे सर्व रस्ते पूर्ववत करून रेती घाट पुन्हा मोकळा करण्यात आला व त्या दिवसापासून आज पर्यंत राजरोसपणे रात्रंदिवस अवैध रेती उत्खनन सुरूच आहे व अजून रेती अवैध उत्खनन करताना किती निष्पाप मजुरांचे बळी घेतल्यावर रेती घाटावरील अवैध उत्खनन बंद करणार ? असा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप गेडाम यांनी केला आहे.
सुनील तायडे संपादक. डेली पोस्टमार्टम