चंद्रपूर: 12 ऑक्टोबर ( सुनील तायडे )
रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी, आदिवासी बहुजन समाजाची एकमुखी मागणी.
शतकांपासुन दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचे अत्यंत तिरस्काराने दहन करण्यात येते. समाजात ही प्रथा अज्ञान व अविचाराने रूढ झाली. परंतु ज्ञानाच्या स्फोटामुळे विवेकाची प्रभा फाकली व सत्य बाहेर येऊ लागले. महाराजा रावण हे गौंड गणाचे अधिपती होते. त्याकाळचा गौंड गण म्हणजे दैत्य, दानव, राक्षस तर आजचा आदिवासी समाज होय. त्यामुळे महाराजा रावण हे आदिवासी समाजाचे आदिपुरूष ठरतात. ते आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान आहेत. भारताच्या बऱ्याच भागात महाराजा रावण यांची मनोभावे पुजा करण्यात येते. इतकेच नाही तर महाराजा रावण प्रकांड पंडीत होते. विविध शास्त्रांचे प्रचंड ज्ञान असुन धर्मशास्त्रात पारंगत होते. त्यामुळेच महाराजा रावण मृत्युशय्येवर असतांना श्रीरामांनी आपल्या धाकट्या भावाला लक्ष्मणाला राजशिष्टाचार, नितीशास्त्राचे धडे घेण्यासाठी रावणाकडे पाठवले होते. स्वत:च्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रतीपक्षाच्या अतिशय प्रिय व्यक्ती सितेचे अपहरण करणे व अशोकवाटीकेत बंदिस्त करणे यामुळे महाराजा रावण तिरस्कारास पात्र ठरत नाहित. अधर्म व दुष्कृत्य आपण ज्याला समजतो त्याची प्राचीन वैदिक वाड़मयात पावलोपावली प्रचिती येते.मग रावणाने केलेले अपहरण हे अधर्म कसे ? रावणाने केलेले कृत्य हे एका भावाला व सर्वशक्तिमान सम्राटाला शोभेसेच होते.आपल्या चुका लपवण्यासाठी त्याचे खापर दुसऱ्यावर फोडण्याची मानवी प्रवृत्तीच आहे. महाराजा रावणाबाबत हेच घडले आहे आणि यामुळेच महाराजा रावणाबाबत समाजात चालत आलेला तिरस्कार व त्यांच्या प्रतिमेचे दहन हे निंदनिय ठरते. ज्या महाराजा रावणाच्या प्रतिमेचे कि जे बहुजनांचे श्रध्दास्थान आहेत, दहन डोळ्यांसमोर होत असेल तर कोण सहन करणार ? काळ झपाट्याने बदलत आहे, ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रूंदावत आहेत आणि अशा परीवर्तनशील काळात असल्या अमाणुष प्रथा समाज पाळत असेल तर तो समाज अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. अशा अंध समाजाचा काय उपयोग ? असा सवाल जागरचे अध्यक्ष अशोक तुमाराम यांनी पत्रपरीषदेत उपस्थित केला. चंद्रपूरातील समाजसेवक भुषण फुसे म्हणाले कि ज्या कृतीने बहुसंख्य समाजबांधवांच्या भावना दुखावत असतील तर त्या प्रथा तात्काळ बंद कराव्यात. यामुळे सामाजिक स्वास्थ्य व सलोखा बिघडण्याचीच शक्यता अधिक असते. तेंव्हा महाराजा रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याची ही कुप्रथा बंद व्हायलाच पाहिजे व प्रशासनाने या दिशेने सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे.
म्हणुनच महाराजा रावणाच्या सन्मानार्थ दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोज गुरूवारला शहीद बाबुराव शेडमाके स्मारक, जेल परीसर, चंद्रपूर येथुन दुपारी ठिक १२ वाजता सर्व पुरोगामी विचारांच्या व सत्य स्विकारणाऱ्या संस्था व व्यक्ति यांच्या सहकार्याने प्रबोधनात्मक भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत बहुसंख्य जनतेने सामिल होऊन समाजातील कुप्रथा संपवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जागरचे अध्यक्ष अशोक तुमराम व समाजसेवक भुषण फुसे यांनी केले आहे.
पत्रपरीषदेस अशोक तुमराम, भुषण फुसे, जितेश कुळमेथे, नरेन गेडाम, चरणदास भगत, वामन गणवीर, कपुर आत्राम, कमलेश आत्राम, बाबुराव जुमनाके, जमुना तुमराम, रंजना किन्नाके, वैशाली मेश्राम, प्रिती मडावी, दिवाकर मेश्राम, मनोहर मेश्राम व इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.