चंद्रपूर- सावली तालुका मुख्यालयापासून २५ किमी असणाऱ्या गेवरा खुर्द येथे एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना मृतक शालीक चापले यांच्या शेतात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. ह्यामुळे परिसरातील गावात खळबळ माजली आहे
सावली वनपरिक्षेत्रातील गेवरा नियतक्षेत्रालगत शेतकरी शालीक मणिराम चापले (५३) यांचे शेत आहे. या शेताच्या बाजूला वैनगंगा नदी असून, नदीला लागून झुडूप आहे. शालिक चापले शेतात आपल्या पत्नीसमवेत काम करीत असताना वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. घटनास्थळापासून वाघाने त्यांना झुडपात ओढत नेले व तेथे त्यांच्या नरडीचा घोट घेतला. बायकोने ओरडा- ओरड केला असता त्यांना टाकून वाघ पळून गेला. घटनास्थळी गावकरी जमले आणि त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळाल्यावर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने पोहचले. सदर घटनेनंतर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. परिसरात कॅमेरे लावले असून गस्त वाढविण्यात आली आहे. मृतकाचे नातेवाईकांना तातडीची २५ हजारांची मदत देण्यात आलेली असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी कळवले आहे.