अहेरी :- अहेरी तालुक्यातील तानबोडी ते विजापूर मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात तानबोडी येथील 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत युवकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राप्त माहितीनुसार, रोशन संतोष मडावी (वय 17 वर्षे, रा. तानबोडी, ता. अहेरी) हा आपल्या मित्रांसह लग्न समारंभासाठी किष्ठापूर येथे जात होता. दि. 06 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास रितेश सिडाम यांच्या मालकीच्या एमएच-33 एस-1836 क्रमांकाच्या दुचाकीवर रोशन मडावी, प्रमोद कुमराम आणि अखिल गावडे असे चौघेजण प्रवास करीत होते. दरम्यान, तानबोडी ते विजापूर जंगल मार्गावरील सुमारे 16 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. अपघात इतका भीषण होता की रोशन मडावी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याचे साथीदारांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रोशन मडावी यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अपघातात इतर युवकांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी प्रभाकर दशरथ सडमेक (वय 27 वर्षे, रा. तानबोडी) यांनी दिलेल्या माहितीनुसार अहेरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू खबरी क्रमांक 025/2026 अंतर्गत कलम 194 बीएनएसएस 2023 अन्वये नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस नाईक मनीषा मुलकवार करीत असून अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षल व्ही. एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. ग्रामीण भागातील जंगल मार्गांवर रात्रीच्या वेळी होणारी वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि सुरक्षेच्या उपायांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे तानबोडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.





