चंद्रपूर पोलीस प्रशासनाचा अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा!
पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडमध्ये
चंद्रपूर: जिल्ह्यातील अवैध धंध्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (lcb) जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये छापेमारी करून अनेक ठिकाणी कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या क्राइम मीटिंगमध्ये अवैध धंध्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर, जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील अवैध धंध्यांवर “ऑपरेशन क्लीन” अंतर्गत कारवाई सुरू केली आहे.
तथापि, काही ठिकाणी रेती तस्कर, कोळसा तस्कर आणि क्रिकेट बुकी अजूनही पोलीसांच्या नजरेआडून आपले धंदे चालवत आहेत. मात्र, विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षकांच्या स्पेशल पथकाची धास्ती?
जिल्ह्यात रुजू झाल्यावर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अवैध धंधे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस विभागाकडून कारवाई सुरू झाली आहे. मात्र, काही पोलीस अधिकारी आपल्या हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई टाळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक सध्या नाशिक येथे गेले असले तरी त्यांचे विशेष पथक चंद्रपूरमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध धंध्यांवर “नो एन्ट्री”ची स्थिती निर्माण झाली आहे.