गडचिरोली : – आनंद, उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात निघालेली एक लग्नाची वरात काही क्षणांतच दुःखाच्या गर्तेत कोसळल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. गडचिरोली-चामोर्शी मार्गावर आज (दि. 29 मार्च) सायंकाळी सुमारे 6.45 वाजताच्या सुमारास स्कॉर्पिओ आणि प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच व काहि झनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ही दुर्घटना कुरुड – कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील धोकादायक वळणावर घडली. या मार्गावरील हे वळण आधीपासूनच अपघातप्रवण म्हणून ओळखले जाते. सायंकाळच्या वेळेत वाहतुकीची वर्दळ असताना अचानक झालेल्या या धडकेने संपूर्ण परिसर हादरून गेला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाची स्कॉर्पिओ वाहन रामपूर येथून दुपारी सुमारे 3 वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे परतत होती. वाहनात एकूण 16 प्रवासी होते, ज्यामध्ये महिलांचा व लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वजण आनंदात, गाणी म्हणत, लग्नाच्या आठवणींमध्ये रमलेले असतानाच नियतीने त्यांच्यावर हा क्रूर आघात केला.
दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH 15 CK 5005 या प्रवासी ट्रॅव्हल्सशी वळणावर समोरासमोर जबरदस्त धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की स्कॉर्पिओ वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला. काही प्रवासी वाहनातच अडकून पडले होते. धडकेचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि तत्काळ बचावकार्य सुरु केले.स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. काहींना गंभीर दुखापती झाल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. तत्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या आणि सर्व जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच दोन जणांचा वाटेतच मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर सध्या डॉक्टरांकडून उपचार सुरु असून काही जण जीवन-मृत्यूच्या संघर्षात आहेत.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. लग्नाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या कुटुंबांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा आघात कोसळला असून नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हटविण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण वेग, चालकाचा ताबा सुटणे की रस्त्याची अवस्था – याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, या मार्गावरील धोकादायक वळणांवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, वेगमर्यादा काटेकोरपणे पाळली जावी आणि वाहनचालकांनी विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
__________________________________________
(बॉक्स )
लॉयडस मेटल्स किंवा त्रिवेणी कंपनीचा कुठलाही संबंध नाही, दोष नाही___
आज चामोर्शी जवळ बस आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या अपघाताचा लॉयड्स किंवा त्रिवेणी यांच्याशी कोणताही संबंध नाही. ही बस जानेवारी 2026 पूर्वी कंपनीसाठी चालवली जात होती; मात्र त्यानंतर ती एका खाजगी ऑपरेटरकडून चालवली जात आहे. त्या खाजगी ऑपरेटरकडून कंपनीच्या बॅनरचा बेकायदेशीरपणे, कोणतीही परवानगी न घेता वापर केला जात होता.
या दुर्दैवी घटनेबद्दल आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो आणि या अपघातात झालेल्या अमूल्य जीवितहानीबद्दल आमच्या संवेदना व्यक्त करतो.
शोकाकुल__ लॉयड मेटल्स आणि त्रिवेणी समूह..
__________________________________________
सदर बातमी ही आमच्या अधिकृत माहिती स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे तयार केली आहे. कृपया कोणीही कॉपी करून पुर्नप्रकाशित करू नये.




