जो पर्यंत वजन नाही तो पर्यंत फाईल पुढे नाही ‼️ तुरुंगात रवानगी!

538

उत्पादन शुल्काच्या दोन कर्मचाऱ्यांची तुरुंगात रवानगी; जिल्हा अधीक्षक अद्यापही फरार,

चंद्रपूर 10 मे (सुशांत घाटे ): एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ अटक झालेल्या दोन कर्मचाऱ्यांना आज न्यायालयात सादर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्यांची रवानगी आता तुरंगात होणार आहे. तर या प्रकरणी जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी संजय पाटील हे अद्यापही फरार आहे.

तक्रारीनुसार बिअर शॉपिच्या परवान्यासाठी 1 लाख 30 मागणी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक अभय खताड आणि दुय्यम निरीक्षक चेतन खरोडे यांनी केली होती. जिल्हा अधीक्षक संजय पाटील याच्या सांगण्यावरून ही मागणी करण्यात आली. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी लाच स्विकारल्यानंतर त्यांचा म्होरक्या संजय पाटील याला फोनवर पैसे मिळाल्याची माहिती दिली. यादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ या दोघांना अटक केली. पाटील यावेळी आपल्या स्वगावी कोल्हापूरात होता. ही माहिती मिळताच संजय पसार झाला. या दरम्यान कोल्हापूर येथील त्याच्या तीन आलिशान घरावर एसीबीने छापे टाकले. यात त्याने कमावलेली कोट्यवधीची माया समोर आली. मात्र पाटील हाती लागू शकला नाही. पाटील याची यात महत्वाची भूमिका आहे. कुठलेही कायदेशीर काम फुकट करायचे नाही, जोवर फाईलवर ‘वजन’ पडत नाही तोवर त्याला मंजुरी न देण्याचा शिरस्ता पाटील याने लावला होता, अशी चर्चा आहे. हा आरोप गंभीर त्यामुळे पाटील याची कसून आणि सखोल चौकशी झाल्यास भ्रष्टाचाराचे मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान आज लाच घेणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांना न्यायालयात सादर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढे नेमक्या काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.