चंद्रपुरात पोलिसांच्या नाकावर टीचून गुन्हेगारी डोके वर काढतेय
चंद्रपूर : सदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रीदवाक्यातच पोलिसांचे कर्तव्य सामावले आहे. सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांना नियंत्रणात ठेवल्यास कायदा व सुव्यवस्था पाळता येऊ शकते. यासाठी पोलीस यंत्रणा देखील आपले प्राणपणाला लावून प्रामाणिकपणे हे कर्तव्य बजावीत असते. मात्र याचे पालन होण्यासाठी सक्षम शिलेदारांची आवश्यकता असते अन्यथा हे कर्तव्य केवळ कागदावर यशस्वी होताना दिसते. चंद्रपूर जिल्ह्यात देखील हीच स्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवीन्द्र परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मुसक्या आवळणार आणि गुन्ह्यात घट होणार अशा आशा पल्लवित झाल्या असताना याचे चित्र मात्र विपरीत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांत खून, चोरी, लूट यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे, सोबत गुन्हेगारी क्षेत्र डोके वर काढताना दिसत आहे. जणू कायद्याचा त्यांना कुठलाही धाक उरला नाही. संघटित गुन्हेगारीकडे हा कल जाताना दिसत असला तरी हे नेटवर्क उध्वस्त करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी अद्यापही पाऊल उचलले नाही. भविष्यात याचा मोठा स्फोट झाल्यास पोलिसांना जाग येईल आणि तेव्हा पुलावरून बरेच पाणी वाहून गेले असेल. अचानक अशी परिस्थिती का निर्माण व्हावी यावर पोलीस विभागाने गंभीरपणे विचार करणे गरजेचे झाले आहे. जबाबदारीची पदे ही सक्षम आणि निर्भीड पोलीस अधिकाऱ्यांना देण्याऐवजी कागदी घोडं नाचविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पदरी पडल्याने हा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. केवळ दुचाकी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या भुरट्या चोरांना अटक करणे म्हणजेच आपण मोठे यश मिळवले या आविर्भावात वावरणारे अधिकारी असल्याने खऱ्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात कोळसा तस्करी, डिझेल चोरी, वाळू तस्करी आणि अन्य अवैध धंदे जोमात सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकेवर काढत आहे भविष्यात याचे एक मोठे रॅकेट तयार होत आहे तसे झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान असणार. मात्र त्या दृष्टीने पोलीस विभागातील सक्षम अधिकारी कठोर पाऊल उचलताना दिसत नाही. अनेकांच्या निदर्शनास ही बाब येऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांची प्रतिमा ही स्वच्छ असली तरी त्यांनी जिल्ह्यातील ही स्थिती बघता तातडीने कठोर पाऊले उचलणे गरजेचे झाले आहे.