विभागीय स्पर्धेसाठी इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या 2 विद्यार्थ्यांची निवड

52

चंद्रपूर : एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी संचलित इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या 2 विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. इयत्ता आठवीचा विद्यार्थी अंकित यादव याची जिल्हा व्हॉलीबॉल संघात, तर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शर्लिन उराडे हिची जलतरण संघात निवड झाली आहे. हे दोन्ही विद्यार्थी नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय स्पर्धा व निवड चाचणीमधील कामगिरीच्या जोरावर अंकित यादवची जिल्हा संघात निवड झाली आहे. तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय 50 मीटर फ्री स्टाईल जलतरण स्पर्धेत शर्लिन उराडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे शर्लिनचा जिल्हा जलतरण संघात समावेश करण्यात आला.

या दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल चव्हाण व रेशमा पठाण यांनी स्पर्धेसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. दोन्ही निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक बावानी जयकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल पुगलिया, समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे प्रशासक जयकुमार सर, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.