- चंद्रपूर: शिक्षण विभागाद्वारे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कला उत्सवामध्ये इंदिरा गांधी गार्डन स्कूल येथील चार विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाप्रकारांमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून एका विद्यार्थिनीने द्वितीय पुरस्कार प्राप्त केला आहे.
विविध स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांना ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग अंतर्गत वर्ष २०२२-२३ करिता केंद्र शासनाद्वारे केंद्रशासित प्रदेश व राज्यस्तरावर कला उत्सव आयोजित करण्यात येतो. जिल्हास्तरावर ऑनलाईन घेण्यात आलेल्या या उत्सवात शास्त्रीय गायन पारंपरिक गायन, तालवाद्य गायन, स्वरवाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपारिक लोकनृत्य, दिमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प व खेळणी तयार करणे व नाट्य (भूमिका अभिनय) असे दहा कला प्रकारांच्या समावेश होता.
संपूर्ण जिल्ह्यातून हजारो विद्यार्थ्यांनी या दहाही कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला. ह्यापैकी दिमितीय चित्र (2D पेंटिंग) प्रकारात इंदिरा गांधी गार्डन स्कूल येथील अवनी चंदावार ( वर्ग ९) व त्रिमितीय शिल्प (3D शिल्प) प्रकारात कृष्णा आहुजा(वर्ग ९) याने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. अशाच प्रकारे शाळेतील तनिष्क माढई (वर्ग १० वा) याने तालवाद्य वादन (हार्मोनियम वादन) मध्ये प्रथम व निर्मिती बदखल (वर्ग ९) हिने शास्त्रीय गायन ह्या कला प्रकारात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. कला प्रकारातील विजयी विद्यार्थांना शाळेचे कला शिक्षक चंद्रशेखर घुटके व गायन व वादन प्रकारातील विजयी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक लोभेश पिल्लेवार यांचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवनात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदिरा गांधी गार्डन स्कूल च्या या चारही विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या चारही विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून हे विद्यार्थी नागपूर येथे 22 व 24 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षरीत्या आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
शाळेत घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये या चारही विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या बवानी जयकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. शाळा संचालन समितीचे उपाध्यक्ष राहुल पुगलिया, समितीचे सदस्य, शाळेचे प्रशासक जयकुमार सर व सर्व शिक्षकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहे.