पक्षवाढीच्या धोरणाचे खा. सुप्रिया सुळे यांनी समर्थन केले.

114

चंद्रपूर: १७ सप्टेंबर ( सुनील तायडे )

स्वतःच्या पक्ष वाढविण्यासाठी ते जर प्रयत्न करीत असतील तर त्यात गैर काय – खा. सुप्रिया सुळे

राज्याच्या आघाडीतील तीन पक्ष एकत्रित येऊन समर्थपणे काम करीत आहे. पण स्वतःच्या पक्ष वाढविण्यासाठी ते जर प्रयत्न करीत असतील तर त्यात गैर काय असा प्रश्न उपस्थित करीत आघाडीतील घटक पक्षांकडून सुरू असलेल्या स्वतःच्या पक्षवाढीच्या धोरणाचे खा. सुप्रिया सुळे यांनी समर्थन केले. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून प्रसिद्धीसाठी आरोप करीत असल्याची टीका करीत याआधीही आमच्यासंदर्भात ट्रकभर पुरावे होते, त्याचे काय झाले असा टोला त्यांनी सोमय्या यांना येथे एका पत्रकारपरिषदेत बोलताना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खा. सुप्रिया सुळे या रविवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका बघता आघाडीबाबत अद्याप काहीही ठरले नाही. त्याबाबत सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे हे एकत्रित निर्णय घेतील असेही त्यांनी एक प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलून टाकला असून लसीकरणासह देशात सर्वच क्षेत्रात राज्याने भरारी घेतली आहे. ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून न परतण्याचा पूनरुच्चार त्यांनी केला.

करोनामुळे मागील दिड वर्षात मोठा फटका बसला. पण आता स्थिती सुधरतेय. पण तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. मतभेद असले तरी हरकत नाही, पण चर्चा व्हावी असे सांगत पक्षातील सर्वानीच पक्ष मजबुतीसाठी एकत्रितपणे काम करायला हवे असेही खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.