अखेर जन विकास सेनेच्या डेरा आंदोलनातील कामगार जिंकले, औद्योगिक न्यायालयाचा मोठा दिलासा.

194

चंद्रपूर: १ ऑक्टोबर ( सुनील तायडे )

कामगारांचे थकीत पगार न्यायालयात जमा करण्याचे व कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करण्याचे वैद्यकीय महाविद्यालयाला आदेश.      थकित पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील 235 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 500 जवळपास कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मागील सोळा महिन्यापासून कामगारांचे सात महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2021 पासून कामगारांनी काम बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलं-बाळ व कुटुंबासह डेरा आंदोलन सुरू केले होते.वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने कामगारांचे थकीत पगार देण्याऐवजी त्यांच्या जागेवर नवीन कंत्राटी कामगारांची भरती केली.या विरोधात वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत दर्शना झाडे,सविता दुधे,माधुरी खोब्रागडे

व निशा हनुमंते या कामगारांनी
चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालयामध्ये स्थगिती आदेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयामध्ये जवळपास तीन महिन्यापासून या अर्जावर नियमित सुनावणी सुरू होती.संपूर्ण डेरा आंदोलनाचे भवितव्य या प्रकरणाच्या निकालावर अवलंबून होते.अखेर दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान न्यायालयाने या प्रकरणांमध्ये स्थगिती दिली.कामगाराचे थकीत वेतन एक महिन्याच्या आत न्यायालयात जमा करण्यात यावे तसेच सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे असे आदेश सुध्दा न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले आहेत.
कामगारांना ज्यादिवशी पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात येईल त्या दिवशी डेरा आंदोलन मागे घेऊन अशी प्रतिक्रिया डेरा आंदोलना मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिलेली आहे.

अत्यल्प शुल्क घेऊन एड. प्रशांत खंजाची व एड. मोहन निब्रड यांनी न्यायालयात कामगारांचा किल्ला लढविला

चंद्रपूर जिल्ह्यातील निष्णात विधिज्ञ विधिज्ञ एडवोकेट प्रशांत खजांची यांनी अत्यल्प शुल्क घेऊन सामाजिक भावनेतून औद्योगिक न्यायालय कामगारांचा किल्ला लढविला.
त्यांचे ज्युनियर वकील मोहन निब्रड यांनी सुद्धा पूर्ण ताकदिनिशी कामगारांची बाजू मांडली. दीपक चटप यांनी वेळोवेळी कामगारांना कायदेशीर सहकार्य केले.

कामगारांचा दुर्दम्य इच्छाशक्तीचा अंगावर शहारे आणणारा संघर्ष.

इंदिरानगर येथे राहणाऱ्या आशिष वाढई या कंत्राटी कामगारांची मागील चार दिवसांपासून वीज कापल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब अंधारात राहत आहे.अनेक कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही,भाड्याने राहणाऱ्या कामगारांच्या मागे घर मालकांचा तगादा, जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी अनेक किराणा व्यावसायिकाकडून उधारी वर किराणा मिळवून दिला परंतु प्रत्येक ठिकाणी उधारी वाढल्यानंतर होणारी अडचण, कोविड आपत्तीमध्ये काही कामगारांचे कुटुंबातील सदस्यांचे उपचाराअभावी झालेले मृत्यू तसेच आर्थिक तणावामुळे प्रदीप खडसे त्यांची पत्नी व संगीता पाटील या तिन कामगारांचे झालेले मृत्यू,वादळ वारा पाऊस झेलत कधी हल्ला बोल आंदोलन, कधी अमित देशमुख गो बॅक आंदोलन असे अनेक आंदोलने करून गुन्हे अंगावर घेणारे कामगार असा मागील आठ महिन्यांपासून अंगावर शहारे आणणारा थरारक अनुभव असतानाही कामगार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत वारंवार बैठका घेऊनही तांत्रिक अडचणीचे कारण सांगून कामगारांच्या हक्काचे वेतन नाकारण्यात आले.अखेर न्यायालयाने न्याय दिला.त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा विजय झाला अशी प्रतिक्रिया या आंदोलनातील आंदोलनकर्त्या कामगारांनी माध्यमांशी बोलताना दिली.