चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जादूटोण्याच्या संशयावरून एकाच परिवारातील वृद्धेसह ३ जणांना मारहाण केल्याच्या धक्कादायक घटनेप्रकरणी पाचही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान मिंडाळा टोली येथील इंदिराबाई उपासराव कामठे (७०) यांचा मुलगा अशोक कामठे (४५) हा जादूटोणा करतो या संशयावरून नागभीड तालुक्यातील मिंडाळा टोली येथील प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम व कान्पा येथे राहणारी मयुरीची आई चंद्रकला यादव आत्राम यांनी इंदिराबाई कामठे यांची मुलगी यशोधा (३८) हिला घरी जाऊन हात बुक्क्यांनी मारहाण केली होती . त्यानंतर पिल्ला आत्राम व प्रमोद सडमाके यांनी अशोक कामठे याला नागभीड येथून त्याचे मोटारसायकलने मिंडाळा येथे जबदस्तीने आणून पाण्याच्या टाकेचे लोखंडी ॲगलला दोरीने बांधून बॅट व बांबूचे काठीने मारून जखमी केले. इंदिराबाई उपासराव कामठे हिने सोडवायला गेल्यावर तिलाही काठीने मारून जखमी केले.
इंदिराबाई कामटेनी बुधवारी आपल्या मुलगी यशोधासह सर्व आरोपींवर कारवाई होण्याकरिता पोलीस स्टेशन नागभीड येथे येऊन तोंडी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला होता. प्रमोद सडमाके, सीताराम सडमाके, मयुरी सडमाके, पिल्ला आत्राम व मयुरीची आई चंद्रकला यादव आत्राम या आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली होती. आज गुरुवारी नागभीड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केले असता पाचही आरोपींना ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान जिवती येथून सुमारे १२ किमी अंतरावर असणाऱ्या वणी खुर्द या गावात २१ ऑगस्टला भर दुपारी जादूटोण्याच्या संशयावरून हात-पाय बांधून ७ जणांना मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३७ आरोपींना अटक केली आहे. ह्या आरोपींपैकी अनुसूचित जाती व जमातीमध्ये मोडणाऱ्या आरोपींव्यतिरिक्त इतर ७ आरोपींना ॲट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.