सलग तीन दिवसापासून पुन्हा प्रदूषण ओकू लागले महाऔष्णिक विद्युत केंद्र

149

चंद्रपुर: महाजनको या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वीजनिर्मिती कंपनीच्या चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (महाऔष्णिक विद्युत केंद्र)या कारखान्यातून शनिवार 28 ऑगस्ट ला सकाळपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतांना पुन्हा दिसून आल्याने महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे याच महिन्यात प्रदूषणाची चाचपणी करायला 3 संयंत्र बसविण्यात आले.चाचपणीचा कालावधी संपताच हा प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे 28 ऑगस्ट पासून 30 ऑगस्टपर्यंत आजतागायत प्रदूषण अव्याहतपणे पसरत आहे. महा औष्णिक प्रबंधन या प्रदूषणाकडे डोळेझाक करीत आहे.

शनिवार ला सकाळी अतिशय काळ्या रंगाचा धूर कारखान्यातून निघून शहराच्या दक्षिण भागाकडे खाली येत असल्याचे स्पष्ट दिसत होते.चंद्रपूर ने प्रदूषणात उच्चांक गाठला आहे.येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आणि वीज निर्मिती केंद्र यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उजेड पसरत असला तरी चंद्रपूर मात्र दिव्याखाली अंधार अशा स्थितीत सापडला आहे.पालकमंत्री वडेट्टीवार यांनी उच्च प्रदूषणासाठी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला जिम्मेदार ठरवत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फसले जात आहे याकडे लक्ष वेधले होते.त्या अनुषंगाने कारवाई करण्यापूर्वी प्रदूषणाची पातळी व हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी सोमवार(23ऑगस्ट)ला 3 एमबीएन्ट एअर क्वालिटी मॉनिटरिंग मशीन बसविण्यात आल्या. सलग 3 दिवस 24 तास या मशीन कार्यरत ठेवून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाईची दिशा निश्चित केली जाईल असे स्पष्ट संकेत दिले गेले असतांना आज शनिवारला महाऔष्णिक विद्युत केंद्र पुन्हा प्रदूषण ओकत असल्याचे दिसून आल्याने या प्रकाराला जवाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार.

सिटीपीएस कारखान्याला पर्यावरण संवर्धनासाठी आयएसओ 9000, आयएसओ 11000 अशी मोठी पुरस्कार मिळालेली आहेत. परंतु अशा महत्त्वाच्या कारखान्याकडून होत असलेले प्रदूषण शहरातील लोकांचे आरोग्य धोक्यात टाकत आहे.कारखान्याचे प्रदूषण दिसताच,सकाळी पर्यावरणीय कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी श्री अशोक करे यांना फोन वर कळवून तक्रार केली, महाजनकोवर कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी दिले. परंतु अशी कित्येक आश्वासनं हवेत विरले आहेत.

पालकमंत्र्यांना सिटीपीएसने दिला खो….

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त समिती सिटीपीएस च्या आवारात प्रदूषण मोजण्यासाठी आली होती, या समितीने तीन ठिकाणी प्रदूषण मापक यंत्रणा लावली होती.युनिट क्र.8 व 9च्या परिसरात,तुकुम परिसरात व युनिट क्र.3 व 7 च्या मधात हे संयंत्र बसविण्यात आले. ही समिती तीन दिवसांच्या देखरेखी नंतर परत गेल्याबरोबर सीटीपीएस चे प्रदूषण पुन्हा सुरू झाले आहे.त्यामुळे पालकमंत्री व प्रदूषण मंडळाला सिटीपीएसने ‘खो’ दिला अशी चर्चा आहे.